बाप्पाच्या उत्सवात संस्कृती अन् जनजागृतीचा संगम

Foto
आगमनाने शहरात उत्साह; भक्तीसोबत सामाजिक बांधिलकीचा जागर
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): ढोल-ताशांचा गजर, 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे शहरात जल्लोषात आगमन झाले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक उत्सव साजरा न करता सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि जनजागृतीचा संदेश देण्याचा संकल्प विविध गणेश मंडळांनी केला आहे. त्यानुसार यंदाच्या उत्सवाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची जोड देत विविध स्पर्धा, सांस्कृतिक
कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच विविध विषयांवरील जनजागृती मोहिमा राबविण्याची तयारी मंडळांनी केली आहे. गणेश मंडप हे भक्तीबरोबरच सामाजिक संवादाचे आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र बनले आहेत.
'कुलस्वामिनी'चा आकर्षक देखावा
▶ कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाचे यंदा सतरावे वर्ष आहे. यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे ते ४१ फुटी उंच श्री गणेशमूर्तीचे. सुमारे ४५ फुटी उंच झाडाच्या हा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे, अशी माहिती कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली. संपूर्ण देखाव्यासाठी इको फ्रेंडली बांबूच्या कामट्या, काथा व रस्सी यांचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि पारंपरिक कलाकुसर यांचा सुंदर मिलाफ या देखाव्यात पाहायला मिळणार आहे. मंडळाच्या या सातत्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर विविध पारितोषिकांनी मंडळाचा गौरव करण्यात आला आहे. यंदाच्या देखाव्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, उर्वरित काम उद्यापर्यत पूर्ण होईल. कार्यकर्त्यांच्या श्रमातून साकारलेली ४१ फुटी गणेशमूर्ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज सायंकाळी ४ ते ५ यावेळेत स्थापना केली जाणार आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन
▶ यंदाच्या उत्सवात रांगोळी चित्रकला, निबंध, लेखन, वक्तृत्व, हस्ताक्षर, प्रश्नमंजुषा, गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः बालक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळांकडून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
https://epa Powered By: Vrudhee Solutions